Santosh Deshmukh Case: बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड यांना कोठडीत ठेवण्यात आल्यामुळे याठिकाणी सध्या विशेष सुरक्षा वाढवण्यात आली आहे. वाल्मिक कराड यांच्यावर संतोष देशमुखांच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे.
बीड: गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात चर्चेत असलेल्या संतोष देशमुख हत्याप्रकरणात दररोज नवी माहिती समोर येत आहे. संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करणारे तीन मारेकरी अद्याप फरार आहेत. तर या हत्याप्रकरणाचा सूत्रधार असल्याचा आरोप असलेल्या वाल्मिक कराडने (Walmik Karad) पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. सध्या बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड यांची सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. बुधवारी बीड शहर पोलीस (Beed Police) ठाण्यातील एका बंद खोलीत वाल्मिक कराड यांची चौकशी करण्यात आल्याचे समजते. मात्र, त्यानंतर आणखी एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख बुधवारी अचानक वाल्मिक कराड यांना ठेवण्यात आलेल्या बीड शहर पोलीस ठाण्यात पोहोचले. ते काहीवेळ पोलीस ठाण्यात थांबले, अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यानंतर बाहेर पडले. बीड शहर पोलीस ठाण्यातून बाहेर आल्यानंतर धनंजय देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
धनंजय देशमुखांना अचानक पोलीस ठाण्यात बोलावले गेले की ते स्वतःहून आले होते, याबाबत चर्चा होती. मात्र, धनंजय देशमुख यांनी तपास किती पुढे आला आहे याची माहिती घेण्यासाठी पोलीस ठाण्यात आल्याचे सांगितले. “मी स्वतःहून सीआयडी कार्यालयात आलो होतो. दोन दिवसांपूर्वीही आलो होतो. तपास किती पुढे आहे याची माहिती घेतली. माझ्याकडून काही सहकार्य अपेक्षित आहे का किंवा मी काही मदत करू शकतो का, हे मी सीआयडी अधिकाऱ्यांना विचारले. तपास चांगल्या पद्धतीने सुरू आहे. माझी तपास अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. एसआयटी स्थापन झाली आहे याची माहिती मिळाली. एसआयटीमध्ये कोणते अधिकारी आहेत, हे जाणून घेऊ,” असे धनंजय देशमुख म्हणाले.
बीड शहर पोलीस ठाण्यात येणाऱ्यांची नोंदणी
बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड यांना कोठडीत ठेवण्यात आल्यामुळे याठिकाणी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे नाव आणि येण्याचे कारण नोंदवून घेतले जात आहे. हा डेटा दररोज सीआयडी आणि पोलीस अधीक्षकांकडे पाठवला जाणार आहे. वाल्मिक कराडच्या चौकशीतून सीआयडीला कोणती महत्त्वाची माहिती मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.